संगणक-कौशल्य शिक्षणासाठी मराठीचे महत्व
इंग्रजी म्हणजे पैसा हे समीकरण कदाचित बरोबरही असेल पण इंग्रजी म्हणजे समृद्धि (सर्वांचा विकास) मुळीच नाही हे समजून येणारा एक अनुभव नुकताच आला.
व्यवसाय व कौशल्य शिक्षणाबाबत वर्तमान प्रशासन पूर्वासुरींपेक्षा कितीतरी जागृत आहे ही एक उपकारक बाब मानावी लागेल. तरीपण हे नेमके कसे करावे व त्यातून चांगले परिणाम लौकरात लौकर कसे मिळतील याबद्दल कित्येक पटीने अधिक सखोल विचार व्हायला हवा आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अनुभव व ज्ञानही कुठेतरी कमी पडताहेत याचे एक उदाहरण नुकतेच ठळकपणे दिसले. मानव संसाधन मंत्रालयाने स्किल डेवलपमेंंट इनिशिएटिव्ह स्कीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक पॉलिटेकनीक कॉलेजामार्फत बीसीआयटी (बेसिक कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) असा एक महिन्याचा कोर्स राबवण्याची योजना आहे. या एका महिन्यात संगणकाची हाताळणी, इंग्लिश की-बोर्ड शिकणे, व चार प्रमुख संगणकीय कौशल्य -- म्हणजेच वर्ड-एक्सेल-पॉवर प्वाईंट-ईमेल शिकणे एवढे अभिप्रेत आहे.
अशा २-३ संस्था बघण्यांत आल्या ज्यांनी ही सुरुवात केली आहे. मुली-मुले येतात पण एक महिन्याचा कोर्स संपूनही टायपिंग व्यवस्थित शिकलेले नसते त्यामुळे पुढील उत्साह मावळतो.
हे पाहिल्यावर या प्रक्रियेतील कळीची चूक कुठे आहे आणि तिचे निराकरण कुठे आहे हे लक्षात आले. पॉलीटेकनीकच्या प्रिन्सिपॉल्सना ही माहिती नसावी कारण ज्या संस्था असा कोर्स चालवीत होत्या त्यांना ही माहिती नव्हती. म्हणून हा लेखनप्रपंच.
संगणकावर काम करता येण्याची पहिली अट म्हणजे टंकन करता यायला हवे. त्यातून नोकरी मिळवायची असेल तर वेगाने टंकन करता यायला हवे. ज्यांना पूर्वींचे टाइपरायटिंग क्लासेस स्मरणांत आहेत त्यांना आठवेल की इंग्लिश टायपिंग चा प्रतिमिनिट ३० शब्द हा वेग येऊन नोकरी मिळण्यासाठी ६ महिन्यांचा कोर्स करावा लागत असे. याच्या कारणावर फार कमी जणांनी विचार केला आहे. पण इतका वेळ लागतो कारण टायपिंगचा की-बोर्ड त्यांनी शिकलेल्या इंग्रजी वर्णक्रमानुसार नसतो. तो डोक्यांत व बोटांत बसायला तीन महिने आणि टंकनात वेग येण्यााला पुढील तीन महिने असा तो कोर्स असायचा.
म्हणूनच पॉलिटेकनीक मार्फत आखलेला बीसीआयटी कोर्स प्रभावी ठरत नाही. कारण ज्या मुली-मुलांना आयुष्यांत पहिल्यांदाच संगणक हाताळायला मिळत असतो त्यांना तेवढ्या एका महिन्यांत हा इंग्रजी की-बोर्ड डोक्यात आणि बोटांत ठसवता येईल ही अपेक्षाच चुकीची आहे -- वेग ही तर अजून लांबची गोष्ट.
याच्या निराकरणाचा सोपा उपाय म्हणजे हाच बीसाआयटी कोर्स मराठी माध्यमातून करायचा. संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टंकन शिकवले तर की-बोर्ड डोक्यांत व बोटात बसायला ३ दिवस आणि वेग येण्यासाठी पुढील १५ दिवस पुरेसे आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. याचे कारण इनस्क्रिप्ट की-बोर्डाची आखणी मराठी वर्णक्रमानुसार केलेली आहे व तो इंटरनेटलाही कम्पॅटिबल आहे. पुढील कालावधीत वर्ड-एक्सेेल-पीपीटी-ईमेेेल हे शिक्षण पूर्ण करता येते. असा कोर्स पूर्ण केल्यास रोजगार मिळण्याची संधी आज ग्रामीण भागातही आहे कारण ग्राम-पंचायत, तलाठी कार्यालय, तालुका-ऑफिस इथे मराठी टंकनाची प्रचंड कामे असतात.
मात्र यात एक महत्वाची अट अशी आहे की तेवढ्या एका महिन्याच्या कालावधीत इंग्रजी टंकन शिकवण्याच्या मोहात पडायचे नाही अन्यथा इंग्रजी वेग तर येणारच नसतो पण मराठीतील वेगही लक्ष केंद्रित न झाल्यामुळे हरवतो. हा मोह टाळता येणार का -हा प्रश्न पॉलीटेकनीक पेक्षा संस्थाचालकांना अधिक लागू पडतो कारण इंग्रजीशिवाय पैसा नाही हे समीकरण त्यांच्या मनात पूर्णपणे ठसलेले असते, तिथे मराठीला अस्मितेला वाव तर नसतोच पण अशा प्रयोगशीलतेबद्दलही साशंकता असते.
सुदैवाने ३-४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने जीआर काढून शासन व्यवहारात सर्वांनी मराठीसाठी इनस्क्रिप्ट की-बोर्डच वापरावा असे निर्देश दिले आहेत. याचाच अर्थ मराठी टंकनासाठी कोणता की-बोर्ड लेआउट हा प्रश्न आता उरलेला नाही. मात्र मराठी की इंग्रजी हा प्रश्न येतो तेंव्हा अजूनही ठामपमे मराठी हे उत्तर नसते. म्हणूनच मराठीचे काय लाभ आहेत, त्यात किती सोपेपणा आहे, ८वीच्या आधीच शिक्षण सोडावे लागले त्यांना किती सोईची आहे इत्यादी सर्व मुद्दे विचारात येतच नाहीत.
आजही महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणविणाऱ्या राज्यातही पहिलीत जाणाऱ्यांपैकी ७० टक्के मुली-मुले ८वीत जाता-जाता गळलेली असतात. त्यांच्यासाठी मराठी सहज-सुलभ असते व इंग्रजी महाकठिण. ८ वीत शाळा सोडून बेरोजगारांच्या कळपांत प्रवेश करणारी दरवर्षी किमान १५ लाख मुली-मुलेआहेत. बीसीआयटी सारखे महिन्याभरात छोटेसे कौशल्य मिळवून देणारे कल्पक कार्यक्रम हाती घेऊनही ते आपण इंग्रजी धार्जिणेच ठेवले तर दरवर्षी १५ लाख मुली-मुलांना आपण संधी असूनही कौशल्यातून मिळणाऱ्या रोजगारापासून वंचितच ठेवत राहू. याने मराठीची किंवा देशाची अस्मिता वाढत नाही हे नक्कीच, पण समृद्धिची संधीही आपण स्वीकरलेल्या इंग्रजी म्हणजे पैसा या चुकीच्या समजुतीमुळे गमावून बसतो.
----------------------------------------------------------------------------------------------
मंगलवार, 31 मई 2016
सदस्यता लें
संदेश (Atom)