****लीना मेहेंदळे****
टाईपरायटरचे युग असताना टाइपिंग येणे हे निव्वळ एक कौशल्य होते. ते पोटापाण्यासाठी अर्थार्जनाचे साधन होते, पण ज्ञानार्जनाचे नव्हते. मशीनच्या यांत्रिक मर्यादेमुळे टाइपराइटरची कळपाटी (की-बोर्ड) उल्टीपुल्टी होती, पण तीच शिकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कामचलाऊ टाइपिंग येण्यासाठीसुध्दा किमान महिनाभराचा सराव लागायचा आणि ज्यांचे अडलेले नसेल ते त्या वाटयाला जात नसत. मराठी व भारतीय लिप्यांबाबत या यांत्रिक मर्यादा अधिक होत्या, म्हणून मराठी टाईपरायटर शिकणे त्याहून किचकट होते - एवढे जनरल नॉलेज सर्वांकडे आले.
टाईपरायटरचे काम करू शकणारे, शिवाय सोबत इतर असंख्य कामे करू शकणारे संगणक (कॉम्प्युटर) नावाचे यंत्र आले आणि त्याने ज्ञानार्जनाचे व द्रुतगती संदेशवहनाचे रस्ते खुले केले. सुरुवातीपासून (सुमारे 1945पासून) ते 1985पर्यंत त्यावर फक्त रोमन वर्णमाला लिहिण्याची सोय होती आणि तीदेखील त्याच उल्टयापुल्टया कळपाटीनुसार! पण आता ते शिकून घेण्यात कित्येक मोठया संधी, प्रेस्टिज व कार्यक्षमता दडलेल्या होत्या आणि ज्यांना ज्यांना संगणक-सोइचे महत्त्व पटले, त्यांनी ती कळपाटी शिकून घेतली. अशा लोकांमध्ये सरकारातील मध्यम व उच्च श्रेणीचे अधिकारी मोठया प्रमाणावर होते.
1985-1995 या काळात संगणकावर मराठीचा वावर सुरू झाला, तोही मराठी टाईपरायटरच्या किचकट कळपाटीच्या आधारानेच - 'रेमिंग्टन की-बोर्ड' हे जिचे नाव एव्हाना रूढ झाले होते. त्यामुळे ज्यांनी ज्ञान, प्रेस्टिज, कार्यक्षमता इ.साठी रोमनचा किचकट की-बोर्ड शिकून घेतला होता, त्यांच्याकडे त्याहून किचकट असा मराठीचा की-बोर्ड शिकण्याचे धैर्य नव्हते, त्यामुळे जितक्या टाइपिस्ट-क्लार्कने पूर्वी मराठी टाईपरायटर शिकला व वापरला होता, तेवढेच आताही मराठी संगणक वापरू शकत होते. त्यातच 1995मध्ये इंटरनेटचा वापर सुरू झाला, तेव्हा ते मराठी इंटरनेटवर चालत नाही ही भलीमोठी उणीव दिसली. यामुळे संगणकावर मराठी शिकण्याचा विचार मागे पडत राहिला. त्याऐवजी भाषा मराठी पण दृश्य अक्षरे रोमन हा पर्याय - म्हणजे tu kuthe jatos? असे लोक लिहू लागले. वाचणारेदेखील tu kuthe jatos? असे रोमनमध्ये वाचून त्यातील मराठी भाव समजून घेऊ लागले. आणि 2004मध्ये एक दिवस काँग्रेस राज्य आले. 1995 ते 2004 या काळातील अपयश लपवण्याला वाव निर्माण झाला.
काय होते ते अपयश?
1991मध्ये सीडॅकने एक उत्कृष्ट कळपाटी डिझाइन तयार केले. त्याला मी 'वर्णमाला-अनुसारी' किंवा 'बालसुलभ कळपाटी' म्हणते, कारण आपण शाळेच्या पहिल्या इयत्तेत शिकतो त्याप्रमाणेच अनुक्रम असलेली - म्हणजे अआइईउऊएऐओऔ किंवा कखगघङ, अशी एकासोबत एक अक्षरे असलेली आणि आणि सबब मराठी टाईपरायटरचा किचकटपणा समूळ काढून टाकलेली अशी ती कळपाटी होती. तिला नाव दिले 'इनस्क्रिप्ट'. पण जुन्या काळापासून चालत आलेला रेमिंग्टन की-बोर्डही त्यांनी पर्यायी राहू दिला. हेतू हा, की जुने मराठी टाइपिस्ट रेमिंग्टनचा पर्याय वापरतील आणि नवे लोक इनस्क्रिप्ट वापरतील. मग सीडॅकला एकाएकी बिझनेस आठवला आणि देशाच्या संपत्तीवर पोसलेल्या पगारी वैज्ञानिकांनी हे नवे सॉफ्टवेअर विक्रीस काढले. पण बाजारातील इतर रेमिंग्टन-आधारित मराठी सॉफ्टवेअर्स थोडी स्वस्त (12000 रु.), तर यांनी जास्त (15000 रु.) किंमत लावली. ते लावताना आमची इनस्क्रिप्ट नव्या लोकांना किती उपकारी, हे सांगायला विसरले. ते बहुधा मार्केटिंग तंत्र शिकले नव्हते. त्यांना कंट्रोल करणारे केंद्र सरकारातील अधिकारीही राजीव गांधींच्या नव्या बिझनेस संस्कृतीमध्ये रंगलेले होते. संगणकावर भारतीय भाषांना प्रोत्साहन महत्त्वाचे की पैसा? यामध्ये पैसा जिंकला, हे पहिले अपयश; कारण हे कमी किंमतीला दिले तर भारतीय भाषा वेगाने संगणकावर आरूढ होतील, हेच ओळखता आले नाही. शिवाय पैसाही प्रत्यक्ष मिळाला नाही, कारण मार्केटिंग जमेना.
मग फतवा काढून सर्व सरकारी कार्यालयांना ते सॉफ्टवेअर घेणे अनिवार्य केले आणि सीडॅकने आपण किती पैसा कमवला म्हणून पाठ थोपटून घेतली. पण त्या सॉफ्टवेअरमध्ये अतिसोपी अशी वर्णमाला अनुसारी कळपाटी आहे असे कितींना कळले आणि कितींनी ते वापरायला सुरुवात केली, ती टक्केवारी आजदेखील फार कमी आहे - हे दुसरे अपयश.
1997-2000 या काळात लीनक्स-युनिकोड या जोडीने इनस्क्रिप्टचा सोपा की-बोर्ड आणि इंटरनेटस्नेही असे सॉफ्टवेअर फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध केले. मात्र लीनक्सचा भारतातील शिरकाव हळूहळूच होणार होता. त्या तुलनेत आधी इथे आलेल्या मायक्रोसॉफ्टनेही आपण मागे पडू नये म्हणून तसे पॅकेज विंडोज एक्सपीमध्ये व विंडोज 7मध्ये दिले, पण फारशी माहिती न देता. त्यामुळे अजूनही tu kuthe jatos? असेच लिहून तसेच वाचले जात होते. लीनक्स-मायक्रोसॉफ्टची नवीन माहिती लोकांना मोठया प्रमाणावर झाली असती, तर सीडॅकचे अपयश अजून ठळठळीत दिसले असते, कारण त्यांचे सॉफ्टवेअर अजूनही इंटरनेटवर चालत नव्हते. पण तेवढयात काँग्रेस राज्य आले.
काँग्रेस राज्य आले आणि भारतीय लिप्या मागे ओढण्याचे पर्व सुरू झाले. लोकांना समजवण्यात आले की ''तुम्ही रोमनमधूनच लिहा पण दृश्य अक्षरे मराठी असतील अशी युक्ती तुम्हाला देतो - म्हणजे तुम्ही tu kuthe jatos? लिहा आणि संगणकाच्या पडद्यावर ते 'तू कुठे जातोस?' असे दिसेल.'' लोकांनी हे सर्व कधी नाइलाजाने, तर कधी आनंदाने स्वीकारले; कारण संगणकावर तो जुना, किचकट, उल्टापुल्टा की-बोर्ड न वापरता विनासायास हिंदी-मराठी शिकता येईल असा की-बोर्ड असू शकतो, ही कल्पनाच फार लोकांना सुचली नाही, किंवा तिचा शोध घ्यावा असेही सुचले नाही. अगदी सीडॅकचे कंट्रोलिंग म्हणवणारे गृहखाते असो की राजभाषांसाठी कटिबध्द आहोत असे सांगणारे राजभाषा खाते असो - अशी पध्दत 1991मध्येच अस्तित्वात आली आहे, ती सीडॅकनेच आणली आहे याची कदाचित त्यांनाच माहिती नव्हती, आणि जाणून घेण्याची जबाबदारी आहे ही जाणीवही नव्हती. त्यामुळे तिचा प्रचारच झाला नाही, हे देशाचे आणि मराठीचे दुर्दैव. ती आहे, 1991पासून होती, 1998पासून तर ती मोफत आणि इंटरनेटवर टिकण्याच्या सोयीसकट आली होती किंवा 2002मध्ये ती विंडोजवर मोफत आल्यामुळे तिची उपलब्धताही खूप - म्हणजे खूप सुगम झाली होती, हे सांगण्याइतके तांत्रिक ज्ञानही त्यांना नव्हते. आणि उत्साह तर कदाचित त्याहूनही कमी होता.
अपयश लपवण्यासाठी
मग सीडॅकने 2005मध्ये 'रोमन लिखे - हिंदी दिखे' या पध्दतीचे सॉफ्टवेअर विज्ञान भवनात जंगी कार्यक्रम करून व सोनियाजींच्या हस्ते त्याचा शुभारंभ करून त्याच्या एक कोटी सीडीज मोफत वाटल्या
(संदर्भ - Annual Report - Centre for Development of Advanced ...
In Multilingual Computing, C-DAC launched free CDs containing Indian Language ..... Smt.Sonia Gandhi, Chair ... The language software tools and fonts CDs are distributed free of cost through ...... Release of Hindi Software Tools and Fonts was organized by C-DAC, Noida at Vigyan Bhawan, New Delhi, on June 20, 2005.)
लक्षात घ्या की तेव्हाच त्यांना 'मराठी लिखे- मराठी दिखे', किंवा 'बंगाली लिखे तो बंगाली दिखे' या प्रकारच्या सीडीही वाटता आल्या असत्या. आपल्याकडील वैज्ञानिक टॅलेंट उत्तम आहे यात शंका नाही, पण राष्ट्रीय दृष्टी मात्र कमी पडत होती, हेही तितकेच खरे.
म्हणून असे झाले की आता रामाचे नाव घेतले की आपल्याला र हे भारतीय अक्षर नाही आठवतात, तर आर, त्यापुढे ए, त्यापुढे एम ही अक्षरे आठवात. अशी ही भारतीय वर्णमाला विसरण्याची नांदी तर झाली बुवा!
खरे तर वर्णमाला अनुसारी इनस्क्रिप्ट कळपाटी शिकणे किती सोपे आहे, ते वरील चित्रावरून लगेच कळून येईल.
म्हणून जे लोक अजूनही रोमनमधून मराठी लिहितात, त्यांना सांगावेसे वाटते की ''बाबांनो, निरुपाय होता, माहिती नव्हती तेव्हा रोमनचा आधार घेऊन का होईना, मराठी भाषेत लिहीत राहिलात - कौतुक आहे तुमचं. पण आता आपल्या वर्णमालेवर आधारित अत्यंत सोपी व इंटरनेटवर टिकेल अशी पध्दत सुगमतेने उपलब्ध आहे. अगदी मामुली सरावाने ती तुम्हाला जमणार आहे. म्हणून आतातरी आपली वर्णमाला रोमनच्या तुलनेत हरवू नये, यासाठी थोडा विचार करा.''
अर्थात शेवटी मला सुमारे 30 वर्षांपूर्वीचे एका आयएएस सहकाऱ्याचे शब्द आठवतात - ''मी मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घातले आहे, म्हणजे त्यांना मराठी-हिंदी का आली नाही हा प्रश्नच नको. आम्ही घरात त्यांच्याशी कटाक्षाने इंग्लिशच बोलतो. त्यांना शिकून अमेरिकेतच जायचे आहे. प्रगती, श्रीमंती सर्व काही तिथेच आहे. इथे राहायचंय कोणाला आणि कशाला?''
अशांचा राग नाही, पण आपली भाषा, लिपी आणि अत्यंत वैज्ञानिक अशी आपली वर्णमाला विसरली जाऊ नये, मृत होऊ नये, चिरंतन टिकावी, म्हणून इथे राहिलेल्यांनी तरी मराठी लिहिताना ती देवनागरी वर्णमालेच्या आधारानेच लिहावी.
9869039054
leena.mehendale@gmail.com