बुधवार, 25 फ़रवरी 2009

संगणकावर शिका मराठी टायपिंग बोटे ठेवणे व कीबोर्ड प्रॅक्टीस
































संगणकावर मराठी टायपिंग
सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा अन्य भारतीय भाषिकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो.
संगणकाचा सर्वत्र बोलबाला झाल्यावर खूप लोकांनी गरजपुरते एका बोटाने करण्या इतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. त्यांची संगणकाची भीती मोडलेली आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट.
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास ही चित्रफीत पहावी.]

दोन मिनिटांत 20 अक्षरे
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील H, Y या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा. की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
गरज असल्यास या लेखाच्या शेवटी दिलेले कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र पहावे.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर AQ -- ओऔ, SW-- एऐ, DE-- अआ, FR-- इई, GT—उऊ अशी अक्षरे किंवा काना-मात्रा लिहिता येतात.
अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.
. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क (K) आणि
‘हूक’ लिहिण्यासाठी ह (U) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते.
‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.
हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहायचा असेल तर कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.

माझ्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी - सहावीत जाणा-या मुलीमुलांना देखील मी ही युक्ति शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घेते. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.
उरलेली अक्षरे
उरलेल्या 16 अक्षरांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र आणि ऋ ही अक्षरे आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला 10 मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना - मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.
जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D या अच्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते. अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.
तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून अन्तर्जालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी ! ) धडाधड मराठी वाङ्.‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
पण - परन्तु
आता कोणत्याही युक्ती किंवा जादूच्या मागे कांही तरी पण - परन्तु असतातच आणी कोणत्याही जादूगाराला त्यांचे भान ठेवावेच लागते. या सोप्या की-बोर्डच्या वापरासाठीही लेखकांनी दोन - चार मुद्दे ध्यानांत ठेवले पाहिजेत.
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा (586 या चिपचा) असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असली पाहिजे. 2000 सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत. संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन रीजनल ऍण्ड लँग्वेज सेटिंग च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेज च्या प्रश्नावर मला हिन्दीचे (म्हणजेच देवनगरी किंवा मराठीचे) ऑप्शन हवे आहे असे सेटिंग सुरूवातीला एकदा कधीतरी करून घ्यावे लागते.

ते करून झाले की संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसू लागते. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार वर लेफ्ट क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी इंग्रजी ऐवजी Hi म्हणजे हिंदी हे ऑप्शन निवडता येते. असे ऑप्शन द्यायचे आणि टायपिंगला सुरूवात करायची.
गुगलच्या जी-मेल वर किंवा याहू-मेल वर आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने टाईप करू शकतो. फक्त टास्कबार Hi ऑप्शन देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देउन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून विषय दिल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

मायक्रोसॉफ्ट वर दबाबतंत्र हवे, ते आणणार कां?
सुरूवातीला सांगितलेली पध्दत वापरून मेनू बार वर हिंदीचे ऑप्शन मिळवणे हे पुष्कळांना कटकटीचे वाटेल पण ते अजिबात कठिण नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीला ही सोय बाय डिफाल्ट देता आली असती आणि लेखकांना ही खटपट देखील करावी लागली नसती. आपल्या देशांत मायक्रोसॉफ्ट कंपनी अक्षरश: लाखो संगणक विकते. तरीपण आपले सरकार तुम्हीं बाय डिफाल्ट हे ऑप्शन उघडे ठेवा असे ठणकावून का नाही सांगत? कांही कांही संगणकांना ही सोय पण देत नाहीत, ज्यांना युक्ती माहीत असेल त्यांनी .............. साईट वरून डाउनलोड करून घ्यावी असा कांहीसा उर्णटपणा दाखवला जातो. याला कारण आपल्या गृहखात्यातील राजभाषा व आय्‌टी या दोन्हीं विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांची भारतीय भाषांबद्दल असलेली तीव्र उदासीनता व अज्ञान (त्यांनी हे करून पाहिलेलेच नसते – खोटं वाटत असेल तर माहिती अधिकाराखाली विचारून पहा.) हे ऑप्शन उघडे ठेवा असे सांगणे तर फारच क्षुल्लक. पण आपल्या सर्वच भारतीय भाषांबाबत संगणकावर जे अनंत गोंधळ चालतात त्यापैकी कुठलाच गोंधळ ठणकावून सुधारण्याची इच्छाशक्ती शासकीय अधिका-यांकडे दिसून येत नाही.
त्यामुळेच, म्हणजे आपल्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शिरजोर होऊन मायक्रोसॉफ्टने एक चलाखी अजून केलेली आहे. विन्डोज XP वापरणा-या प्रत्येक संगणकात एक किंवा दोनच भारतीय भाषा ते बसवतात. त्यामुळे एखाद्या संगणकांत हिंदी-मराठी नसेल आणी बंगालीच असेल किंवा मल्याळीच असेल असेही होऊ शकते. अशा वेळी आपल्या विक्रेत्याकडे आग्रह धरून मराठी ऑप्शन मिळवून घ्यावे.
खरे तर इन्सक्रिप्ट ही सिस्टिम भारत सरकारच्या सी-डॅक या संस्थेने सुमारे 20 वर्षांपूर्वी तयार केली. परंतु तिची किंमत ठेवली रू.15,000/- च्या पुढे. त्यामुळे सोपी असूनही ती कोणालाच वापरता आली नाही. यावरून आपल्या सरकारांचे राष्ट्रभाषा किंवा राजभाषेवरील प्रेम (?) समजून येते.

विन्डोज विकणा-या मायक्रोसॉफ्टने देखील याचे फॉन्टस उपलब्ध करून देतांना खूप तांत्रिक अडचणी निर्माण करून ठेवल्या होत्या. शेवटी लीनक्स या ओपन सिस्टिम वाल्यांनी या पध्दतीची महती ओळखून स्वत:च Unicode वर ही पध्दत वापरून ते सर्व फॉन्टस लीनक्स व गुगल वर उपलब्ध करून दिले तेंव्हा स्वतःची भारतीय बाजारपेठ टिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यातील कांही सुविधा देऊन टाकल्या. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी प्रत्येक काम मार्केट, प्रॉफिट, विक्री या तत्त्वावर करते. या उलट लीनक्स चे तत्त्व आहे की प्रत्येकाने आपण निर्माण केलेली नवीन सोय त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून जगाला मोफत उपलब्ध करून द्यावी. याचसाठी त्यांची सिस्टिम झपाट्याने वाढत आहे व त्यांचे तत्त्वज्ञान मान्य असणारे त्यांत भर टाकीत आहेत.
इनस्क्रिप्टची अजून एक जादू
इनस्क्रिप्ट हा एकच लेआऊट (म्हणजे कीज वापरण्याची पध्दत) सर्व भारतीय भाषांना चालतो कारण तो संस्कृतजन्य वर्णमालेवर आधारीत आहे. त्यामुळे या एकाच लेआऊट वर सर्व भारतीय लिपिंचे ऑप्शन उपलब्ध होण्यास कांहीही अडचण नाही. विन्डोजची ऑपरेटिंग सिस्टिम न वापरता हल्ली कांही जण लिनक्स ही ओपन सिस्टिम वापरतात. त्यांच्याकडे ही सर्व सुविधा बाय डिफॉल्ट उपलब्ध आहे. त्यांच्याकडेही की बोर्ड वर मराठी टायपिंग याच पध्दतीने होते, शिवाय मोजक्या लिपींची कटकट उद्भवत नाही. भारतात एकूण नऊ लिपी वापरल्या जातात पण सर्वांची वर्णमाला सारखीच आहे व त्या सर्व लीनक्स वर उपलब्ध आहेत.

एकूण तीन उपाय
अशा प्रकारे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वापरणे, विन्डोज XP वर हिंदी ऑप्शन टाकून घेणे या खेरीज तिसरा उपाय आहे जो जुन्या संगणकांना देखील चालू शकतो, तो म्हणजे आपल्या संगणकावर - इझम किंवा लीप ऑफिस हे सॉफ्टवेअर बसवून त्यांच्या मार्फत वरील इनस्क्रिप्ट की बोर्ड ले - आऊट वापरणे. सदरहू इझम व लीप ऑफिस ही दोन्ही सॉफ्टवेअर सीडॅक या संस्थेने सुमारे 15 वर्षापूर्वी बाजारांत आणली असून इतकी वर्षे लोकांना सहजासहजी व अत्यल्प किंमतीत उपलब्ध झाला नाही व अजूनही होत नाही या बद्दल सर्व लेखकांनी एकत्रित आवाज उठवला तर कांही होऊ शकेल असे वाटते.
भारतीय भाषांमधील संगणक वापरातील इतर गोंधळांबाबतही आवाज उठवण्याची गरज आहे. मात्र लीनक्सच्या धडाक्यामुळे इनस्क्रिप्ट लेआऊट आता या वेगळ्या पध्दतीने उपलब्ध झाला आहे. तसेच लीनक्स आणि गूगल ने पुढाकार घेतल्यामुळे भारतीय लेखकांना वरील प्रमाणे सोप्या पध्दतीने भारतीय भाषा लेखन शक्य होत आहे. त्यामुळे आता मराठी मधे धपाधप ब्लॉग तयार करून अंतर्जालावर मराठी पानांची संस्था वाढवण्यासाठी सर्व मराठी लेखकांनी मोहीम उघडणे शक्य आहे.






















हाच लेख थोड्या विस्ताराने महाराष्ट्र शासनाच्या खालील लिंक वर वाचता येईल.
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf
दिनांक 11.11.09 रोजीचा अपडेट --
नुकतेच आपण कांहीतरी साध्य केले ते असे --
सीडॅक या भारत सरकारच्या कंपनीचे मतपरिवर्तन करण्याचे घूप प्रयत्न झाल्यानंतर आता त्यांच्या साईटवरून मराठी आयलीप डाउनलोड करता येते व त्याच साईटवर दिलेली ऍक्टिव्हेशन की वापरून ते सॉफ्टवेअर पूर्णत्वाने वापरता येते. त्यांचे अभिनंदन. अर्थात इंटरनेटवर ते अजूनही जाऊ शकत नाही, तसेच इतर भाषांना ही सुविधा देणे बाकी आहे. त्यासाठी अजून चर्चा करावी लागणार.
-------------------------------------------------

1 टिप्पणी:

Unknown ने कहा…

फारच छान. In-script हक फारच सोपा आहे आणि अचूक आहे.

सारंग कुळकर्णी