Monday, June 18, 2012

विज्ञान शिक्षणाला लागलेले ग्रहण १७६ वर्षांनी सुटले -- मराठीकाका


विज्ञान शिक्षणाला लागलेले ग्रहण १७६ वर्षांनी सुटले. 

      मी दि. १२/०६/२०१२ ला   महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री ना. राजेंद्र दर्डांना भेटलो आणि त्यानंतर १७६ वर्षे विज्ञान शिक्षणाला लागलेले ग्रहण सुटले. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील ११-१२ वी पातळीवर मराठी माध्यमातून शिकायचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी केल्या जातील हे ना. दर्डा यांनी या भेटीत स्पष्ट केले आणि संबंधित अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सूचना दिल्या.विद्यार्थ्यांनी  आपल्या शाळा - महाविद्यालयात मराठीतून ११ - १२ वी विज्ञान शाखेचे शिक्षण मिळावे अशी लेखी मागणी केली आणि तेथील शिक्षक / प्राध्यापक मराठीतून शिकवू शकत असतील तर त्या शाळा - महाविद्यालयात एका क्षणात मराठी माध्यमातील विज्ञान शाखेचा वर्ग सुरू होऊ शकतो.  एखाद्या  शाळा - महाविद्यालयाने ११ - १२ वी शास्त्र शाखेचा वर्ग मराठी माध्यमातून सुरु करीत असल्याची माहिती संदर्भासाठी शिक्षण उपसंचालक/ संचालक यांना कळवल्यास विज्ञान शाखेला मराठी माध्यमातून प्रवेश घेण्याची इच्छा असलेले विद्यार्थी तिथे प्रवेश घेऊ शकतील, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा – महाविद्यालये आता याचा लाभ घेत आहेत.
     या घडामोडींमुळे महाराष्ट्र आता जागतिक प्रवाहात सहभागी झाला आहे, असे म्हणता येईल. गेल्या १७६ वर्षांत महाराष्ट्रात अनेक महाविद्यालये निघाली, त्यातील काही  महाविद्यालये शास्त्रशाखेचे म्हणजे सायन्सचे शिक्षण देतात. ज्या महाविद्यालयात शास्त्र आणि त्यावर आधारित अभियांत्रिकी, संगणक, वैद्यकीय, औषध निर्माण अशा  शाखेतील शिक्षण दिले जाते ते मात्र  महाराष्ट्रात स्थानिक भाषेत [मराठी]  उपलब्ध नव्हते. गेली १७६ वर्षे असलेली ही स्थिती आता झपाट्याने बदलेल आणि वरील सर्व शाखांसह इतर कोणत्याही विद्याशाखेतील शिक्षण यापुढे मराठीत मिळू शकेल असे वाटते. ज्ञानाला भाषेची मर्यादा नसते आणि मराठी या समृद्ध संपन्न भाषेतून ज्ञान मिळणे ही तर  सर्व जगासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाची सोय  ठरणार आहे. सारे जग स्थानिक भाषेत शास्त्र , अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी, आतिथ्य, नौकानयन, विमानविद्या, औषध निर्माण यासह कोणताही [अक्षरश: कोणताही ] अभ्यासक्रम आपापल्या स्थानिक भाषेतून शिकवत असताना गेली  काही शतके आपला महाराष्ट्र मात्र या बाबतीत जगाच्या खूप मागे होता. ज्ञानसंपन्न मराठी भाषा आणि भाषकांच्या दृष्टीने ही अत्यंत विसंगत बाब होती. ज्या भाषेत ज्ञान निर्मिती  होते, त्याच भाषेत ज्ञानकोश निर्माण होतात, असा जगाचा अनुभव आहे. जगात आजवर केवळ  मराठी आणि फ्रेंच या दोनच भाषेत ज्ञानकोश निर्माण झाले आहेत, हे लक्षात घेतले तर विज्ञान शाखेचे शिक्षण मराठीतून नसणे हे अतिशय धक्कादायक होते, पण आता ती परिस्थिती बदलतआहे.
  शास्त्र शाखेतील औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण मराठी या प्रगत भाषेतून घेताच येत नाही या अंधश्रद्धेचे ग्रहण महाराष्ट्रातील विज्ञान शिक्षणाला लागले होते. ही अंधश्रद्धा महाराष्ट्रातील शिक्षित पदवीधर वर्गात पक्की रुजली होती.  या अंधश्रद्धेमुळे महाराष्ट्रातील शास्त्र शाखेचे आणि त्या शाखेवर आधारित अनेक विद्याशाखांचे अभ्यासक्रम केवळ इंग्रजी या एकाच भाषेतून शिकवले जात होते. इंग्रजी भाषेची जडणघडण आणि त्यासाठी वापरली जाणारी रोमन लिपी या दोन्हीमध्ये काही भयंकर त्रुटी आहेत. [या त्रुटींसाठी माझे ‘ इंग्रजीचे भारतातील स्थान ‘ हे पुस्तक वाचावे] या भयंकर त्रुटींमुळे इंग्रजीतून कोणताही विषय शिकला की तो बराचसा ' पाठ ' होतो, पण नीट कळत नाही. तोच  विषय भारतीय भाषेत शिकला तर केवळ पाठ न होता चांगला ' कळतो ' असा लाखो भारतीय आणि   इंग्रजांचाही अनुभव आहे. शास्त्रशाखेतील विषय केवळ रोमन लिपीसह इंग्रजी या एकाच भाषेतून शिकल्याने महाराष्ट्रातील लाखो पदवीधरांचे अतोनात नुकसान झाले आहे. शास्त्र शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीतून घेतलेल्या महाराष्ट्रातील अनेक पदवीधरांना शिकत असताना  इंग्रजी शब्द केवळ ' पाठ ' झाले आणि नंतर कामकाजाच्या ओघात त्यातील अनेक शब्दांचे अर्थ दहा, वीस वर्षांनी  ' कळले ' हा अनेकांचा वैयक्तिक अनुभव आहे. अनेक पदवीधरांना काही शब्दांचे अर्थ तर त्यांच्या आयुष्यात कधीच कळले नाहीत. केवळ शब्द ' पाठ ' आहेत आणि अर्थ कळलेला नाही अशा अवस्थेमुळे लाखो महाराष्ट्रीय पदवीधर  नवीन वस्तुनिर्मिती, नवे संशोधन  याबाबतीत जगापेक्षा खूप मागे पडले.  इतर देशातील आणि भारताच्या इतर राज्यातील तरुण नवे शोध लावत असताना त्यांच्या वयाचे महाराष्ट्रीय तरुण आपले अर्धे आयुष्य इंग्रजी शब्द पाठ करण्यात घालवत  असतात. नवीन संकल्पना, नवे शोध लावण्यास योग्य असे  तरुण वय रोमन लिपीतील अक्षरे आणि उच्चार तसेच इंग्रजी शब्दातील विसंगतींशी  झगडण्यात आणि शब्द पाठ करण्यात निघून जाते.  अशाप्रकारे इंग्रजी भाषेतील  घोळ समजावून घेण्यात  आयुष्यातील महत्वाचा काळ घालवावा लागल्याने संबंधित विषयाचे ज्ञान मात्र अपुरे राहते. अपुरे ज्ञान असल्यामुळे चांगले उत्पन्न आणि  उत्तम संधींपासून  महाराष्ट्रीय युवक  गेली दोनशे वर्षे वंचित राहिले  .      मी आणि समर्थ मराठी संस्थेतील माझ्या सहकाऱ्यांनी ही परिस्थिती बदलून महाराष्ट्राला जगाबरोबर आणायचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शास्त्रशाखेचे सर्व उच्चशिक्षण मराठी या अतिशय समृद्ध आणि प्रगत भाषेतून मिळावे यासाठी आम्ही अनेक वर्षे प्रयत्न केले. आता याचाप हिला टप्पा म्हणून ११ वीशास्त्र शाखेचे मराठी माध्यमातील वर्ग यावर्षी सुरु होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची १२ वी शास्त्र [सायन्स] परीक्षा मराठी भाषेतून लिहिण्याची १९७७ पासून परवानगी असूनही शाळांचे मुख्याध्यापक ही माहिती मुलामुलींना देत नसत. अनेक मुख्याध्यापकांना स्वत:लाच  ही माहिती नव्हती, हे मराठी भाषकांचे मोठे दुर्दैव होते.
        ४०० वृत्तपत्रांच्या माध्यमातून तसेच  १०० हून अधिक व्याख्याने देऊन ही माहिती आम्ही मुलामुलींना दिली. या उपक्रमामुळे २०१० मध्ये ११४६, २०११ मध्ये २५४४ आणि २०१२ मध्ये ४९५३ जणांनी १२ वी शास्त्रशाखेतील भौतिक,  रसायन , गणित, जीव [PCMB] या विषयाच्या परीक्षा मराठी भाषेतून लिहिल्या. या विषयांची मराठी पुस्तके नाहीत, वर्गात मराठीतून शिकवले जात नाही,  मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय निवडल्याने समाज तुच्छतेने वागवतो अशा सर्व अडचणींवर मात  करून या ८६४५ विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान शब्दकोशांच्या [ सायन्स डिक्शनरी ] आधारे मराठीतून परीक्षा दिली. मराठीतून १२ वी शास्त्र परीक्षा  दिलेल्या  विद्यार्थ्यांना चांगले यश मात्र मिळाले. हे यश पाहून  मराठीतून शिकण्याचे महत्व इतर विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण अधिकारी यांनाही पटले आहे. मराठी माध्यमाचे शास्त्रशाखेचे वर्ग सुरु करण्याची मागणी समर्थ मराठी संस्थेने महाविद्यालये तसेच शासनाकडे  पूर्वीच  केली होती.
       या मागणीला पहिले यश मिळाले आहे. पुण्यातील पुणे विद्यार्थी गृह या संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयात २०१२ - १३ पासून मराठी माध्यमातील ११ वी शास्त्र वर्ग सुरु होत आहेत. राज्यातील ४० महाविद्यालयांत मागणीनुसार वरील विषय मराठीतून शिकवण्याचे तेथील शिक्षकांनी ठरवले आहे. ११ वी आणि १२ वी शास्त्रशाखेचे शिक्षण मराठी माध्यमातून घेण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना आता यापुढे वरील अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. अनेक ठिकाणी  भौतिक,  रसायन , गणित, जीव [PCMB] हे विषय मराठीतून शिकवण्याची सोय यावर्षी होणार आहे, तसेच मराठी पुस्तकेही उपलब्ध आहेत.

       मराठी माध्यमातील  ११ वी शास्त्र वर्ग सुरु होण्यास अनेक मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिवसेनेचे आमदार मा. दिवाकर रावते, मा. सुभाष देसाई   आणि विद्यमान  शिक्षण मंत्री ना.  राजेंद्र दर्डा या सर्वांचे सहकार्य मिळाले. शास्त्रशाखेचे उच्चशिक्षण  १८३६ पासून महाराष्ट्रात सुरु झाले, त्यानंतर १७६ वर्षांनी आता ते मराठीतून मिळण्यास सुरुवात होत आहे.  शास्त्रशाखेचे उच्चशिक्षण जगातील सर्वोत्तम अशा मराठीतून मिळण्याचा प्रारंभ होण्यासाठी १७६ वर्षे लागावी हे मात्र जगातील नववे आश्चर्य आहे. अनेक मराठी शिक्षितांनी हे शिक्षण मराठीतून मिळण्यासाठी कधीही  प्रयत्न केले नाहीत, तर काहींनी चक्क कडवा विरोध  केला हे त्या अगोदरचे आठवे आश्चर्य आहे.  असो, १७६ वर्षे महाराष्ट्रात जे उपलब्ध नव्हते ते मराठी माध्यमातील  शास्त्रशाखेचे उच्चशिक्षण आता उपलब्ध झालेले आहे.मराठी भाषेच्या समृद्धीमुळे अधिक गुण आणि अधिक आकलन होते. मराठी माध्यमातून इ. १० वी उत्तीर्ण झालेल्या सर्वांनी ११ वी - १२ वी शास्त्र मराठी माध्यमातूनच शिकावे, हे आवाहन!  हिंदी, कन्नड, गुजराती, सिंधी, पंजाबी, बंगाली  आणि इंग्रजी माध्यमातून इ. १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही   शास्त्रशाखेतील  भौतिक,  रसायन , गणित, जीव [PCMB] या  विषयांची मराठी पुस्तके संदर्भासाठी वापरावीत असे मी आवाहन करीत आहे.
       १२ वी शास्त्र शाखेतील गणित, रसायन, भौतिक, जीवशास्त्र  या विषयांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ [ महाराष्ट्र एस एस सी बोर्ड ]  १९७७ सालापासून मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या भाषेत काढत आहे. या विषयांची उत्तरे मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी [देवनागरी आणि अरेबिक लिपीत ] हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या सात भाषांमधून लिहिण्याची परवानगी  आहे. १२ वीचा परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासमोर उत्तराची भाषा लिहायची असते, तिथे वरीलपैकी हव्या त्या भाषेचा सांकेतांक लिहायचा असतो. मराठी भाषेचा सांकेतांक ०२ आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मंडळाच्या  राज्य मुख्य कार्यालयाचा  दूरध्वनी क्रमांक. ०२० – २५७०५०००  आहे. मंडळ सचिवांचा क्र. ०२०२५६५१७५० असून मंडळ अध्यक्षांचा  क्र. ०२० – २५६५१७५१ आहे.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

आपला स्नेहांकित

प्रा. अनिल गोरे.[मराठीकाका]
समर्थ मराठी संस्था , ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११००२
भ्र. ध्वनी ९४२२००१६७१ /   वी पत्ता     marathikaka@gmail.com

No comments: