Friday, March 20, 2009

शासनदरबारी संगणकावरील व्यवहार व पाठपुरावा

मराठी अभ्यास केंद्राचा नेक इरादा
नमस्कार,
शासनदरबारी पुढील मागण्या करायचे मराठी अभ्यास केंद्गाने ठरवले आहे. आपल्या काही
सूचना असतील तर जरुर कळवा.
राममोहन
*संगणकावरील शासकीय व्यवहाराचे प्रमाणीकरण - शासनाकडून अपेक्षा***
१. मराठीच्या संगणकावरील वापरासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान
खात्यामार्फत प्रसारीत केलेल्या सूचनांचा राज्य शासनाने पाठपुरावा करावा. यात
संगणकावर राज्यभाषांमध्ये सर्व शासकीय व्यवहार करण्यासाठी *युनिकोड* पद्धतीचा
वापर अनिवार्य केला असून त्यासंदर्भात निश्चित धोरण आखले गेले आहे.
२. केंद्र शासनाने मान्य केलेल्या युनिकोडच्या तत्वांनुसार महाराष्ट्राचे
माहिती-तंत्रज्ञान विकास धोरण आखून *युनिकोड-अनिवार्य संगणकीय व्यवहार* हे तत्व
सर्व शासकीय पातळ्यांवर लागू करावे.
३. मराठीच्या संगणकावरील प्रमाणीकरणासाठी युनिकोड पद्धत हाच सर्वमान्य आणि
विनामूल्य उपाय असल्यामुळे त्याच्या प्रसार-मोहिमेवर राज्यशासनाने भर द्यावा.
विशिष्ट कालावधीत शासकीय कार्यालयांमध्ये युनिकोडची साद्यंत माहिती उपलब्ध करुन
देण्यात यावी.
४. या विषयावर राज्यशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने परिपत्रके
काढूनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत. ही त्रुटी भरुन काढण्यासाठी
शासनाने युनिकोडच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या व्यावहारिक
उपाययोजनांवर भर द्यावा.
५. मराठीतून इंटरनेट-तंत्रज्ञान प्रभावी आणि सुलभपणे वापरण्यासाठी
युनिकोडला हाच एकमेव तांत्रिक पर्याय आहे. युनिकोड व्यतिरिक्त इतर कोणतीही
पद्धत वापरल्यामुळे संकेतस्थळ, ई-मेल, ई-व्यवहार करताना अनेक तांत्रिक अडचणी
उद्भवतात. उदा. महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ युनिकोडमध्ये नसल्यामुळे त्यावरील
माहिती वाचताना अथवा उतरवून घेताना तांत्रिक अडचणी येतात. त्यासाठी
राज्यशासनाशी संबंधित सर्व विभाग, आस्थापने आणि प्रशासन-संस्थांची संकेतस्थळे
युनिकोडमध्ये रुपांतरित करुन घ्यावीत.
६. युनिकोड हे संगणकाच्या ऑपरेट सिस्टीममध्ये असल्यामुळे विनामूल्य उपलब्ध
आहे. त्यासाठी भाषाविषयक कोणतेही सॉफ्टवेअर (उदा. आकृती, श्रीलिपी इ.) खरेदी
करण्याची आवश्यकता नाही. युनिकोडचा वापर अनिवार्य करतानाच शासनाने मराठीसाठी
असलेली सर्व सॉफ्टवेअर कालांतराने निकालात काढावीत आणि नवीन सॉफ्टवेअरच्या
खरेदीवर बंधने आणून अनावश्यक खर्च टाळावा.
७. सध्या आणि याआधी शासकीय व्यवहारात युनिकोडचा वापर नगण्य असल्यामुळे
कोणताही शासकीय व्यवहार सार्वत्रिक करता येत नाही, तसेच इंटरनेटवरदेखील उपलब्ध
करुन देता येत नाही. त्यासाठी उपलब्ध युनिकोड-कनव्हर्टरचा वापर करुन सर्व
व्यवहार युनिकोडमध्ये उपलब्ध करण्याची सोय करावी.
८. युनिकोड वापर अनिवार्य करतानाच त्याचे किमान प्रशिक्षण सर्व कर्मचारी
वर्गाला देण्यासाठी युनिकोड वापराची माहिती-पुस्तिका, ई-मॉड्युल (सी.डी.
स्वरुपात) इ. साधने वापरुन युनिकोड-प्रशिक्षण व्यवस्था उभारावी. यासाठी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि याविषयात काम करीत असलेल्या संस्थांना एकत्रित
करुन त्यांच्यावर कालबद्ध आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणाची व्यवस्था सोपवावी.
अनावश्यक सॉफ्टवेअर-खरेदीतून वाचणारा निधी या प्रशिक्षणासाठी वापरण्याची तरतूद
करावी.
९. भविष्यातील सर्व प्रगत संगणकीय तंत्रज्ञान मराठीमधून आणण्यासाठी
युनिकोडचाच आधार असेल यावर सर्व संगणक-तज्ज्ञांची एकवाक्यता आहे. उदा.
कनव्हर्टर्स, स्कॅनर्स, संगणक-प्रोग्रॅम्स अशा अनेक सुविधा तसेच ई-शासनासारखा
महाकाय प्रकल्प मराठीतून तयार करण्यासाठी शासनाने तरुण संशोधकांना वाव द्यावा.
यासाठी ईच्छाशक्ती दाखवून प्रगत माहिती तंत्रज्ञानाची कास मराठीतून धरावी.
१०.मराठी शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रम, संगणकाचे अनेक लहान-मोठे
अभ्यासक्रम यांत युनिकोडचे प्रकरण समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या संबंधित
शिक्षण-विभागांनी पुढाकार घ्यावा.
--------------------------------
युनिकोड वापरा मराठीतून ई-मेल करा
MS WORD, EXCEL, POWERPOINT कशामधूनही मराठीतून काम करा...विनामूल्य
आजच आपल्या WINDOWS XP मधील युनिकोडचा पर्याय चालू करा
मराठीतून उपलब्ध अनेक सोयी-सुविधांसाठी पुढील लिंक पहा
http://ildc.gov.in/marathi/mdownload2000.htm

No comments: