शुक्रवार, 1 सितंबर 2017

दोन हुकलेल्या पद्मश्री सन्मानांची कथा -- रा. कृ. जोशी व मोहन तांबे

दोन हुकलेल्या पद्मश्री सन्मानांची कथा --
ही नावे रा. कृ. जोशी व मोहन तांबे ही होत. खालील कथा वाचून आपणही सहमत व्हाल.
मोहन तांबे १९८७ च्या आसपास सी-डॅकमधे आले व त्यांनी संगणकावर भारतीय भाषा यासाठी कामाला सुरुवात केली. त्या आधी टाइप राइटरवर असणारा रेमिंग्टन देवनागरी कीबोर्ड शिकायला ६ महिने लागत. त्या ऐवजी कखगघङ, चछजझञ, असा वर्णमाला-अनुसारी की-बोर्ड करायची कल्पना त्यांना सुचली. सर्वच भारतीय भाषांमधे व्यंजनाला स्वर जोडण्याची पद्धतही सारखीच -- म्हणजे क ला काना का, ब ला दीर्घ ऊकार बू ----वगैरे। त्याचाही उपयोग करता आला. या की-बोर्डाला त्यांनी इनस्क्रिप्ट हे नाव दिले.
एक मोठा प्रश्न असतो काढलेली अक्षरे सुबक व एकसारख्या वळणाची दिसण्याचा. त्यासाढी श्री रा. कृ. जोशींनी खूप श्रम घेतले व सुमारे ३० फॉण्टसेट देवनागरीसाठी तर इतरही प्रत्येक भारतीय लिपीसाठी १०-१५ वेगवेगळ्या वळणांचे फॉण्टसेट त्यांनी सी-डॅकला तयार करून दिले. या वळणांची दखल की-बोर्डला घ्यावी लागत नाही पण प्रिंटिंगच्या वेळी संगणकातील प्रोसेसर त्या प्रमाणे आदेश देतो.
खरा कळीचा मुद्दा असतो तो कोडिंगचा. संगणकाला फक्त हो आणि नाही (किंवा १ आणि ०) एवढे दोनच संकेत कळत असल्याने प्रत्येक मानवी अक्षरासाठी ८ संकेतांची एक एक संकेत-श्रृंखला ठरवून द्यावी लागते. असा सर्व अक्षरांचा व त्यांच्या संकेत-श्रृंखलेचा (म्हणजे कोडचा) एक चार्ट तयार करावा लागतो. दोन वेगवेगळ्या प्रोग्रामर्सचे चार्ट वेगवेगळे असतील तर त्यांना एकमेकांचे लेखन वाचता येणार नाही. म्हणून अशा सर्व कोडिंगमधे एकवाक्यता हवी. इंग्लिश अक्षरांसाठी ही एकवाक्यता १९७० च्या आसपासच ठरली होती -- त्याचे नाव ASCII CODE. सबब भारतीय लिप्यांसाठी ISCII CODE करण्याचे ठरले. ते थोडेफार केलेही. पण त्यांत खूप redundancies असल्याने ते वापरायला खूप स्पेस खर्च होते या सबबीवर शब्दरूप, अक्षर, या सारख्या त्या काळातील भारतीय टंकाच्या कंपन्या ते स्वीकारत नव्हत्या.
या मुळे ISCII CODE मधे १९८३-८५ मधे वारंवार बदल केले गेले असतील पण ते यशस्वी झाले नाही.
तांबेंनी जशी सोप्या की-बोर्डाची कल्पना लढवली तसेच ISCII CODE ला पूर्णपणे बाजूला सारून एक नवे व अतिशय सोपे कोडिंग बनवले. हे खूप अक्लिष्ट (सगळा क्लिष्टपणा काढून टाकलेले) कोडिंग आहे. ते त्यांनी १९९१ मधे BIS (bureau of indian standards) च्या गळी उतरवून त्याला मान्यता घेतली.
त्यामुळे राकृंच्या सर्व फॉण्टबँकेसह, सर्व भारतीय लिप्यांसाठी एकच कीबोर्ड असलेला आणि एका की-स्ट्रोकवरच एका लिपीतील मजकूर दुसऱ्या लिपीत उतरवू शकणारा असा एक प्रोग्राम तयार झाला जो त्या काळी ३००० ते ५००० या रेंजमधे विकूनही सी-डॅक फायद्यात राहिले असते आणि राकृंच्या व तांबेंच्या मेहनतीचे सार्थक झाले असते, पण....
इतर भारतीय टंकाच्या कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर १३००० ला विकतात तर आपणही तसेच करावे हा मोह सीडॅकला सुटला. BIS कडे दाखल करून झालेले कोडिंग सार्वजनिक असल्याने त्यावर कॉपी राइट सांगून एवढी किंमत जस्टिफाय करता आली नसती. म्हणून सी-डॅकने पुन्हा एक वेगळे व बऱ्याच रिडंन्डसी असलेले कोड तयार करवून घेतले आणि नवे भारतीय-भाषा सॉफ्टवेअर १४००० या किंमतीला विक्रीला काढले. त्याला जिस्ट, लीप व शेवटी इझम अशी नावे दिली. पुढे तांबे व त्यांच्या ज्यूनियर्सना देखील सी-डॅक सोडायला लावले (१९९६).
सगळीच भाषा सॉफ्टवेअर्स इतकी महागडी असल्याने सामान्य ग्राहकाला देशाची महागडी भाषा हवी की स्वस्त इंगरजी हवी असा पेच पडत होता व इंग्रजीचीच निवड होत होती. त्यामुळे या सर्वांचे मार्केट खूप डाउन होते. सी-डॅकचे त्याहूनही खाली. म्हणून ज्या राकृंचे व तांबेंचे काम १९९३ मधेच पद्मश्री मिळावी या तोडीचे होते त्यांना फक्त निराशा मिळाली.
१९९५ मधे इंटरनेट क्रांति आली. त्याचबरोबर चीनी व अरेबिक फॉण्ट वापरता यावेत ही मागणी वाढू लागली.त्यासाठी ८ ऐवजी १६ संकेतांच्या संकेत श्रृंखला कराव्या लागल्या. त्यासाठी ASCII CODE ऐवजी युनीकोड आले व त्यांनी जगातील सर्व लिप्यांसाठी कोडिंगचा मक्ता घेतला. भारतीय लिप्यांसाठी त्यांनी BIS ने सार्वजनिक केलेले कोडिंग स्वीकारले. तांबेंच्या प्रयत्नाचे थोडे तरी चीज झाले. पण पुन्हा दोन पण आलेच.
सी-डॅकचा तांत्रिक सल्ला व भारताच्या आयटी खात्यातील अज्ञान यांचा संगम झाला. यांच्यापैकी कुणीही स्वतः इनस्क्रिप्ट वापरले नसल्याने त्यातील बारक्या बारक्या छान खुबी व युक्त्या त्यांना कळतच नव्हत्या. युनीकोड मधील कुणीतरी गोऱ्याने मत मांडले की BIS मधे थोडा बदल करा-- एकातून दुसऱ्या लिपीत लिप्यंतरण होऊ देऊ नका. भारताने याचा लग्गेच स्वीकार केला. चीनी-जपानी-कोरियाई देशांच्या देखील लिप्या वेगळ्या पण वर्णमाला एकच आहे. त्यांनाही हाच फॉर्म्यूला सांगितला . तो त्यांनी साफ धुडकावला. मग अरेबिक वर्णमाला असणाऱ्या पण लिखाणात थोडाफार फरक असलेल्या देशांनी पण त्यांचा सल्ला धुडकावला. त्यामुळे त्यांचे लिप्यंतरण क्षणात होऊन जाते. (याचा प्रकाशनात खूप फायदा असतो). पण ज्या भारतीय लिप्यांची एकात्मता तांबेंनी विचारपूर्वक जपली ती युनीकोड व सी-डॅकने मिळून मोडीत काढली. आता तुम्ही देवनागरीत भगवद्गीता लिहिलीत तर बंगाली वाचकासाठी पुन्हा बंगालीत टाइप करावे लागते हा गीतााा-प्रेसचा दुःखद अनुभव आहे.
दुसरा प्रॉब्लेेम मायक्रोसॉफ्टच्या गुर्मीतून आला. भारतात त्यांचे एकछत्र मार्केट होते. त्यांनी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टम मधे भारतीय भाषांना युनीकोड सपोर्ट नाकारला. आंशिक सुदैव असे की त्याच सुमारास मायक्रोसॉफ्टची प्रतिस्पर्धी लीनक्स ऑपरेटिंग सिस्टम रिंगणात उतरली. ती फ्री डाऊनलोडेबल तर होतीच शिवाय भारतीय भाषांना बाय डिफॉल्ट युनीकोड सपोर्ट देत होती. १९९७ ते २००० या काळात जी जी इन्स्रिप्ट वापरणारी चार पाच हजार माणसे (फक्त) भारतात होती त्यांनी हिरिरीने लीनक्सचा प्रचार केला.-- ती सिस्टम मायक्रोसॉफ्टपेक्षा बरीच अॅडव्हान्स असल्याने सामान्य वापराला ती किचकट वाटते तरीही इनस्क्रिप्ट मुळे ती आपले मार्केट खाणार हे ओळखून मायक्रोसॉफ्टने राकृंना कॉण्ट्रक्ट देऊन प्रत्येक भारतीय लिपीसाठी एक नवा फॉण्ट करवून घेतला व २००३-०४ मधे मंगल या नावाने तो विण्डोज एक्सपी ही नवी सिस्टम घेणाऱ्यांसाठी उपलब्ध केला. लीनक्सही मार्केट सपोर्ट कमी राहिल्याने मागे पडली.
सीडॅकनेही सरकारी आदेशांचा वापर करून इझम सॉफ्टवेअर सर्व सरकारी कार्यालयांच्या माथी मारले पण ते युनीकोड कम्पॅटिबल नसल्याने इंटरनेटवर जंक होत असते. सबब कोणतीही सरकारी वेबसाइट मराठीतून करता येत नाही, व पीडीएफ वापरून केलीच तर ती सर्चेबल असत नाही. मार खाणारा दुसरा ग्रुप म्हणजे प्रकाशन संस्था. त्यांचा वेग इतर देशातील प्रकाशनांंच्या मानाने पाच ते दहा पट मागे पडतो.
कारणे व चुका काहीही असोत पण देशांतील भाषांचा संगणकीय वापर खुरटला तो खुरटलाच. प्रभावहीन इम्प्लीमेंटेशनमुळे राकृ व तांबे हे दोघेही पद्मश्री सन्मानाच्या तोडीचे काम करूनही त्यास मुकले.

1 टिप्पणी:

Ashok and Rekha Shahane ने कहा…

मुळात नावात चूक आहे. "राकृ" नव्हे -- र. कृ -- रघुनाथ कृष्णाजी. हा माझा जवळचा मित्र. आम्ही दोघेही तोतरे. मी त्याच्या मानाने कमी. पण तो तर फारच. हा तोतरेपणा घालवण्यासाठी त्याच्या मास्तरांनी त्याला काही व्यायाम सांगितले होते. एक म्हणजे एकदम भराभरा बोलायचे नाही. हळूहळू बोलायचे : "काका" असे एकदम म्हणायचे नाही. "का--का" असे म्हणायचे. ह्या व्यायामामुळे त्याच्या लहानपणीच लक्षात आले होते की ह्यात "क"चा उच्चार केल्याकेल्याच संपतो आणि "आ"चा उच्चारच तेवढा लांबत जातो. ह्या स्वानुभावामुळे आपल्या मूळाक्षरांमधे "स्वर" आणि "व्यंजने" अशी विभागणी का म्हणून केलेली आहे हे तोतऱ्या माणसांना जितके कळते तितके ते तोतरेपणा नसलेल्या माणसाला कळत नाही, असा साधा निष्कर्ष आम्ही फार पूर्वीच काढला होता.
र.कृ.-ची पद्मश्री हुकली का नाही हा मुद्दा नाही. त्याने केलेले काम पूर्णत्वाला कसे जाणार नाही हे कैक लटपटी करून सरकारातल्या कोणी पाहिले = हा मुद्दा आहे.
ह्याला कुणाकडे काही उत्तर आहे का?