गुरुवार, 30 नवंबर 2017

मन म्हणजे काय

मन म्हणजे काय 
-- rajasee2005@gmail.com

मन म्हणजे काय ? 'मन' कसे असते ? ते खरंच असते का ? ते असते तर नक्की कुठे असते ? मनाचे कार्य काय असते ? मनुष्याला मनाचा नक्की काय उपयोग होतो ? मन इंद्रिय आहे की नाही ? असे अनेक प्रश्न मन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येऊ शकतात. सामान्य मनुष्यापासून संतांपर्यंत, अरसिकांपासून रसिकांपर्यंत,  बद्धापासून सिद्धापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने मनाचा अभ्यास करतो आहे. पण यातील प्रत्येकाला मनाचा थांगपत्ता लागला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक संत, कवी, लेखक, अभ्यासू वक्ते आदींनी 'मना'वरील आपले विचार विविध प्रकारे शब्दबद्ध केले आहेत. आपल्याला हत्ती आणि चार आंधळे यांची गोष्ट ज्ञात आहे. त्यातील प्रत्येक आंधळा त्याच्या मतीगतीनुसार हत्तीचे वर्णन करतो. त्याचप्रमाणे इथेही प्रत्येकाने आपापल्या परीने मनाचे वर्णन केले आहे. त्याच्या त्याच्या परीने ते योग्य असेलही पण म्हणून ते पूर्ण आहे असे आपण नाही मानू शकत. ज्याप्रमाणे भगवंताचे पूर्णपणे वर्णन करणे कोणालाही शक्य झालेले नाही तसेच मनाचे देखील असावे. कारण गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मीच 'मन' आहे. 

सर्व प्राणिमात्रांत भगवंताने मनुष्याला 'मन' आणि 'व्यक्त होण्याची कला' विशेषत्वाने प्रदान केली आहे. एका अर्थाने मनुष्याचे मन हेच मनुष्याचे प्रेरणास्त्रोत आणि त्याचवेळी शक्तीस्रोत देखील आहे. 

*"मन एवं मनुष्याणां कारणं बन्ध मोक्षयो॥"*

मनुष्याचे मनच त्याच्याकडून सर्व काही करवून घेत असते आणि त्याचे बरेवाईट परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात. सर्व संतांनी मनाचा अभ्यास केलेला आहे. पण साक्षेपी अभ्यास केला तर श्री समर्थांनी मनाचा अभ्यास अधिक सुस्पष्ट, सखोल आणि सूत्रबद्ध पद्धतीने केला आहे असेक म्हणावे लागते. याला एकमेव कारण म्हणजे  समर्थांनी लिहीलेले मनाचे श्लोक !!  मनाचे श्लोक लिहिण्याआधी देखील समर्थांनी करुणाष्टकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. 

*'अचपळ मन माझे नावरे आवरीता।'* 

 *'चपळपण मनाचे मोडीता मोडवेना।'*
  
मनाचे इतके सूत्रबद्ध आणि वस्तुनिष्ठ विवेचन खचितच कोणत्या अन्य ग्रंथात केले असावे. म्हणून मनाचे श्लोक' हा प्राचीन आणि आधुनिक मानसशास्त्राचा संदर्भग्रंथ ( handbook ) ठरावा. मानवाने प्रगती केली ती प्रामुख्याने भौतिकस्तरावरील आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल करणे तर खूप दूर पण मनुष्याच्या अंतरंगाची  वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे किंवा त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे सुद्धा मनुष्याला शक्य झालेले नाही असेच म्हणावे लागते. मनाच्या श्लोकांची निर्मितीकथा तशी रंजक आहे. पण ते एक निम्मित असावे असे वाटते. समर्थांसारखा विवेकी संतमहात्मा कोणतीही गोष्ट प्रतिक्रियात्मक करेल हे काही मनाला पटण्या सारखे नाही. 

मनाचा विषय आहे तर 'मन' म्हणजे काय हे सुद्धा आपण थोडक्यात बघूया असे वाटते.
जरी मन मनाला उमजत नसले  तरीही मन म्हणजे एक सुजाणीव आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यातून मानवी व्यक्तित्व प्रतिबिंबित होईल अशी जाणीव. मन म्हणजे व्यक्तित्वाचा सुघटित आकार आचारात आणणे. कांद्याचा पापुद्रा काढता काढता कांदा संपतो. त्याचे 'कांदेपण' डोळ्यांतील पाण्यातून जाणवते. तसेच मनाच्या पापद्र्यांतून सर्वात शेवटी जी विशुद्ध निराकार जाणीव उरते, त्याला मन असे  म्हणता येईल. ह्या काही मोजक्या व्याख्या आहेत. प्रतीभाशाली लेखक 'मन' आणखी विविध प्रकारे मांडू शकतात.

मन ह्या विषयावर, किंवा त्याच्या अभ्यासावर काही तज्ञांचे मतभेद असतील किंवा नसतीलही पण एक गोष्ट मात्र सर्व संतमहंतांनी आणि आधुनिक मानस शास्त्रज्ञांनी एकमुखाने मान्य केली आहे ती म्हणजे जर मनुष्याला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर त्याचा मुख्य रस्ता हा त्याच्या मनातूनच जातो. अर्थात मन प्रसन्न केल्याशिवाय मनुष्य सुखी समाधानी होऊ शकत नाही. मग जेष्टकवी भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी सहज म्हणून जातात.

*"रण जिंकून नाही जिंकता येत मन।*
*मन जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।"*

(* वरील अवतरण अनुवादित आहे)

मनुष्याला लौकिक किंवा पारलौकिक सुख प्राप्त करायचे असेल, भौतिक किंवा पारमार्थिक आनंद प्राप्त करायचा असेल तर प्रथम मन राजी करणे, मनाला जिंकणे अपरिहार्य ठरते. मनाला सोडून कोणतीही गोष्ट करणे शक्य नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज देखील म्हणतात,

*"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।".*

'मन' हा शब्द संतांनी फक्त मनुष्यापुरता संकुचित ठेवलेला नाही. मानवीमन, समाजमन, राष्ट्रमन असे विविध आयाम त्यांनी या मनास जोडले. भारतीय संतांनी मनाची व्यक्तिशः जडणघडण करण्याचा प्रयत्न तर केलाच पण समाजमन कसे खंबीर होईल आणि पर्यायाने राष्ट्र बलवान कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि त्याप्रमाणे समाजाकडून कृती देखील करवून घेतली. ज्यांच्या मनाची 'माती' झाली आहे अशा लोकांच्या मने  चैतन्याने भारुन, त्यांच्यात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्याकडून गौरवशाली कार्य करवून एका अर्थाने इतिहास घडविण्याचा चमत्कार अनेक संतांनी आणि राजेमहाराजांनी केल्याचे वर्णन इतिहासात आहे. शालिवाहनाने 'माती'तून  सैनिक उभे केल्याचे वर्णन आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांमधून कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वराज्यसेवक निर्माण केले. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

समर्थांनी विपुल साहित्य लिहून ठेवले आहे. पण समर्थांची प्रस्थानत्रयी म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या तीन ग्रंथांमध्ये 'मनाचे श्लोक', 'दासबोध' आणि 'आत्माराम' यांचा समावेश आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे समर्थांच्या अध्यात्माच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम म्हणून 'मनाचे श्लोकच' असतील यात बिलकुल संदेह नसावा.
श्री सद्गुरु गोंदवलेकर महाराज, श्री सदगुरु श्रीधरस्वामी आणि अनेक समकालीन संतांनी मनाच्या श्लोकांचा यथोचित गौरव केला आहे. आदरणीय विनोबाजी तर मनाच्या श्लोकांना 'सोन्याची तिजोरी' असे म्हणतात. ह्यातील कौतुकाचा आणि श्रद्धेचा भाग सोडला तरी आचरण सूत्रे म्हणून जरी ह्या श्लोकांकडे पाहिले तरी मनुष्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात बदल करण्याचे सामर्थ्य मनाच्या श्लोकांमध्ये निश्चित आहे.

एकूण मनाचे श्लोक २०५ आहेत. शेवटचा आणि पहिला मंगलाचरणाचा श्लोक सोडला तर उरलेल्या २०३ श्लोकांत समर्थांनी फक्त मनाला उपदेश केला आहे. तसं पाहिलं तर मनाचे श्लोकाचे मर्म पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. 

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा।
गमू पंथ आनंत या राघवाचा।।१।।

वरील श्लोकाच्या शेवटच्या ओळीतच सर्व पुढील श्लोकांचे सार आले आहे. अनंत राघवाच्या मार्गावर चालणे याचा अर्थ मनुष्याच्या देवत्वाकडे प्रवास असाच आहे. 
पण मानवी मनाचे अनेक कंगोरे साधकांना समजावेत म्हणून समर्थांनी या श्लोकांचा विस्तार केलेला असावा असे म्हणायला जागा आहे. अनेक संतसाहित्यातील वर्णनाप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवास 'मनुष्यत्व ते पशुत्व' ( राक्षसत्व) किंवा 'मनुष्यत्व ते देवत्व' असा होत असतो. मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट हे जीवाला परमात्म्याची भेट घडवून देण्यात आहे किंवा जिवात्म्यास आत्मारामाची भेट घडण्यात आहे असे सर्व संत सांगतात. पण मनुष्य स्वभावतः स्खलनशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याला जर देवत्वाकडे न्यायचे असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे मानवी मनाला शिकवण देणे. एकदा का मन कह्यात आले की जगातील कोणतीही गोष्ट मनुष्याला असाध्य नाही. 

ज्याप्रमाणे भारतीय संतांनी, तत्ववेत्त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला तसा पाश्चात्य चिंतकांनी देखील मानवी मनाच्या एकूणच पसाऱ्याचा अभ्यास केला. यामध्ये सिगमंड फ्रॉइड आणि अल्बर्ट एलिस या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. सध्या जगभर प्रचलित असलेली मान्यताप्राप्त मानसोपचार पद्धती म्हणून  विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धती ( Rational Emotive behavioral Therapy ) म्हणून प्रसिद्ध आहे. आयुष्यात हे एक मर्यादित घटनांची मालिका असते. घटना घडत असतात आणि त्या घडतच राहणार. पण सामान्य मनुष्य घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटनांना समस्येचं लेबल चिकटवून टाकतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. आपल्या आयुष्यात घटना घडू लागल्यावर आपल्याला वाटते की त्या घटनेतच समस्या आहे. परंतु समस्येचं वास्तव्य आपल्याच डोक्यात असते. या मूळ गोष्टीपासून मात्र सर्व अनभिज्ञ असतात. म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू. सर्वसाधारणपणे मनुष्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आपापल्या नजरेने बघत असतो. त्यामध्ये तो आपले पूर्वसंस्कार, श्रद्धा आणि पूर्वानुभव मिसळून त्या घटनेकडे बघतो. त्यामुळे त्या घटनेपासून त्या दुःख होण्याची शक्यता जास्त असते. Rebt मनुष्याला विवेक अर्थात विचार करायला सांगते. त्या विशिष्ट घटनेकडे बघताना आपण कोणताही पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता त्या घटनेकडे वस्तूनिष्ठपणे पाहायला शिकविते. जेव्हा आपण कोऱ्या मनाने, शांत मनाने कोणत्याही घटनेकडे बघतो तेंव्हा मनुष्य अधिक सजगतेने त्या घटनेकडे बघू शकतो. आणि जेव्हा 'मी' विरहीत होऊन निर्णय घेतला जातो तेव्हा तो जास्तीत जास्त अचूक असतो. 

Rebt आपल्याला आपल्या समजुती (beliefs)  बदलायला सांगते.  कोणतीही घटना आपल्याला कमीअधिक प्रमाणात भावनावश करते. भावना समजून घेतल्याचं पाहिजेत पण भावना बदलणे अवघड आहे म्हणून भावना बदलण्याच्या प्रयत्न न करता आपण आपले विचार नक्की बदलू शकतो. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय बरेच वेळा घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. विचारानुसार होणारी कृती ही अधिक  लाभदायी असण्याची शक्यता जास्त असते. 

आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात. तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहिले असते. पण तसे तर होतं नाही. याचाच अर्थ आपले विचार हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा हे सुद्धा आपल्याच हातात असते. आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो आणि आपल्याला हवे त्यावेळी आणि हव्या त्या पद्धतीने बदलू शकतो. तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे म्हणजेच स्वतःला सावरणे होय. मनुष्य अस्वस्थ होतो तो त्याच्या विचारांमुळेचं आणि शांत होतो तो सुद्धा त्याचा विचारांमुळेचं.  कोणते विचार निवडायचे याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मग भौतिक रुपात. आजवर आपण जे पाहिले त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो ती ते खरी मानते आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते. आपण जे विचार पेरीत असतो तेच अनंत पटीने वाढून परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत हे आपण सांगू शकतो पण एका बीमध्ये किती फळ आहेत हे सांगणे कठीण असते. फक्त योग्य विचार निवडणे, ते प्रसारित करणे आणि त्यानुसार आचरण करणे जर मनुष्याला जमले तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो. हे जग जसे आहे तसे आपल्याला दिसत नाही तर जसे आपले विचार असतात तसे  ते आपल्या नजरेस दिसत असते. 

समर्थ आपल्याला हेच 'मानसशास्त्र' थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. समर्थांची मांडणी त्या काळानुरूप म्हणजे थोडी अध्यात्मिक स्वरूपाची आहे. विशुद्ध जाणिवेतून मनाच्या शोधाला रामनामातून आरंभ होतो. सद्गुरुकृपेमुळे मन अधिक सजग व्हायला सुरुवात होते. मनाला विवेकाचे अधिष्ठान लाभते. मनाला चांगल्या वाईटाची जाणीव होऊ लागते. ते स्वतःशी संवाद करु लागते. खरंतर त्याचे स्वतःशी द्वंद्व करु लागते. मनात चांगल्या वाईट विचारांची घुसळण सुरु होते. आणि मग विवेकाने मनुष्य चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला सुरुवात करु लागतो. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन मनुष्य नुसता विवेकी होत नाही तर मनुष्यत्व ते देवत्व असा प्रवास करण्यास उद्युक्त होतो. हा प्रवास बहुतांशी अंतर्गत असतो. कारण मूलभूत बदल मनातच होत असतात आणि तेच गरजेचं असतं. बरेच वेळेस अंतरंगातील बदल बाह्यरूपात प्रतिबिंबित होतातच असे नाही. मनाच्या श्लोकात उत्तम भक्त (अर्थात उत्तम पुरुषाची) लक्षणे सांगितली आहेत. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी अनेक सूत्रे सुद्धा अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आढळतात. '

मनुष्याला नेहमी सुख मिळावे असे वाटत असते. पण त्याला सुख मिळतेच असे नाही किंवा खरे सुख म्हणजे काय हे त्याला कळतेच असे नाही. समर्थानी सांगितलेले ह्याचे एकमेव कारण म्हणजे देहबुद्धी. ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी 'विवेका'ची कास धरण्याची समर्थ शिकवण देतात. 'विवेक' म्हणजे विचारांच्या प्रक्रियेला लाभलेली विचारांची खोली. विचाराला स्वच्छ जाणिवांची खोली लाभली की विवेक जन्मतो. विवेक जगण्याची धारणा देतो. विवेकाने क्रिया पालटते. 'विवेक' आणि 'प्रयत्न' हे  समर्थांचे  विशेष आवडते शब्द आहेत. मनाच्या श्लोकांत त्यांनी 'विवेक' हा शब्द अनेक वेळा वापरला आहे. 'विवेके सदा सस्वरूपी भरावे'( १०,१४५) 'विवेके देहबुद्धी सोडून द्यावी'(१२), 'विवेके कुडी कल्पना पालटीजे'(४०), 'विवेके तजावा अनाचार हेवा'(६९),  'विवेके क्रिया आपली पालटावी'(१०५),  'विवेके  मना आवरी स्थानभ्रष्टा'(१०६),  'विवेके अहंभाव याते जिणावें'(११०), 'विवेके अहंभाव हा पालटावा'(११५), 'विवेके तये वस्तूची भेटि घ्यावी'(१७०), 'विवेके विचारे विवंचुनी पाहे'(१७३), इ. अशा प्रकारे विविध पद्धतीने समर्थ आपल्याला विचार करायला सांगतात. 

(* कंसातील क्रमांक हे मनाच्या श्लोकांचे आहेत)

मनुष्याने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत नितीमूल्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्या प्रगतीस काही अर्थ नाही. मनाचे श्लोक मनुष्याला सामान्य मनुष्य ते देव, अर्थात रामाच्या पंथाकडे नेतात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला नि त्याप्रमाणे आचरण केले तर मनुष्य देवत्वास नक्की पोहचू शके यात शंका नाही. समर्थ शेवटच्या श्लोकांत तसे अभिवचन देत आहेत.

मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी॥२०५।।

अर्थात, मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने मनुष्याची अंशतः का होईना उन्नतीच होते असे फलश्रुती वाचल्यावर आपल्या लक्षात येते.

आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्थूलमानाने अभ्यासल्या आहेत. पण प्रत्येक मानसोपचार पद्धतीची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक जाणकार त्याची प्रतवारी वेगवेगळी करु शकेल. सामान्य मनुष्याने मनाच्या श्लोकांकडे पारंपरिक आणि धार्मिक भावनेने न बघता एक विचारपद्धती अर्थात software म्हणून बघितले तर ते अधिक उपयुक्त (user friendly) होईल असे वाटते. तसेच rebt पद्धती ही सुद्धा योग्य प्रकारे आचरणात आणली गेली तर ती सुद्धा उपयुक्त अशीच आहे. आज सारे जग त्याचे चांगले परिणाम अनुभवत आहे. ती पद्धती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. 

इथे एक गोष्ट थोडी परखडपणे सांगावीशी   वाटते की आपल्या संस्कृतीतील गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम आदि ग्रंथ हे मनुष्याचा आत्मिक विकास साधण्यासाठी निर्माण झालेले प्रमाण ग्रंथ आहेत. संतांनी स्वतः ती उच्चस्थिती प्राप्त केली आणि अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे असा शुद्ध हेतू उरात ठेऊन ह्या सर्व ग्रंथाची निर्मिती केली आहे.  त्या 'पोथ्या' नाहीत. आपण त्यांना वस्त्रात गुंडाळून ठेवले ही आपली घोडचूक आहे. जीवन जगण्याची कला शिकविणारी पाश्चात्य लेखकांची अनेक पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्व तत्वज्ञान आपल्या गीतेमधील, ज्ञानेश्वरीमधील,  दासबोधातीलच आहे. असे असूनही आजच्या तरुणपिढीला आपण मनाचे श्लोक, गीता, दासबोध वाचायला शिकवीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही. सध्या समाजात हे सर्व ग्रंथ साठीनंतर वाचायचे असतात असा गोड गैरसमज बेमालूमपणे पसरविला जात आहे. एकीकडे आपण अशा ग्रंथांची पारंपरिक पद्धतीने पारायणे करतो पण त्या ग्रंथातील 'खरे ज्ञान' अथवा 'मर्म' आत्मसात करुन पुढील पिढीस ते आचारण्यास उद्युक्त करीत नाही.  ही खरी शोकांतिका आहे. कोणतेही तंत्र/ शास्त्र वापरात आले तर त्याचा खरा उपयोग आहे. ज्याप्रमाणे नदी म्हटली की वाहतीच असणार तसे आपले सर्व धार्मिक ग्रंथ हे लोकजीवन समृद्ध होण्यासाठी अमलात/ आचरणात आणण्याचे ग्रंथ आहे. नराचा नारायण' करण्याची क्षमता ह्या सर्व ग्रंथांमध्ये आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे. तेव्हा अधिक सजग होऊन हे ग्रंथ तरुणपिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्याला हाती घ्यावे लागेल. 

वरील चिंतनातून साधकांनी / अभ्यासार्थीनी मनाचा अभ्यास अधिक तरलतेने करावा आणि अनंताच्या पंथाकडे सुरु झालेल्या जीवनप्रवासाचा 'आनंद' घ्यावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन माझ्या लेखनास विराम देत आहे.


धन्यवाद.


संदीप रामचंद्र सुंकले

कोई टिप्पणी नहीं: